Followers

Sunday, June 13, 2010

दो नैना और एक कहानी ..

दोघांपैकी कोणाचीच चूक नसावी आणि एकाला आतोनात त्रास व्हावा, याला काय म्हणावे ? सहजासहजी किंवावरचेवर उपाय नसलेल्या गोष्टीचे खापर दोन पैकी एक पक्षावर फोडुन, विषय आपण आपल्यापूरता संपवू बघावा (move on, you know !) आणि तसले कोणी सापडुच नये आणि ,नंतर, आतापर्यंतच्या असल्या सगळ्याचप्रसंगांनी "मी पण, मी पण" म्हणत उत्तरं मागावीत, मग अशावेळी काहिच सूचून ज्याला त्रास झालाय त्यालाघट्ट मिठी मारून आय ऎम सौरी सांत्वनावं की मग हे असले तिढे टाकणा-या जिंदगीलाच "तेरे मासूम सवालोसे, परेशान हूं मै.." असलं काय म्हणून टाकावं कि तेही कळल्यान मग ...
पण एक आहे, गुलजार ची बरीचशी अगम्य (पण बहुदा डी मुळे श्रवणीय) गाणी अशावेळी बरीचशी उमगूनजातात.
"शिंदे बाई नाही आल्या आज, मी ऑफ़ तास घेतेय, मॉनिटर कोणे रे ?"
"हो बाई"
" ऐका रे, गोंधळ नका करू, माझं डोकं दुखतयं, मॉनिटर नावं लिहि फळ्यावर बोलणा-यांची", जोशी बाई-यापैकी नेहमीच पेटलेल्या असत, वेताची छडी हा प्रकार पुस्तकातून, आई बाबांच्या शाळेतल्या गोष्टिंतुनच ऐकलेला, पण जोशीबाईंनी हा प्रकार कुठूनसा पैदा करून दाखवला होता. त्या कधी त्याने मारत नसत पण टेरर म्हणुन नेहमीच जवळ बाळगत. त्यांचा आवाजही इतका भारदस्त होता, कि आम्हाला एकाही विषयालाशिकवायला नसूनही ओव्हरऑल सगळेच त्यांना टरकून असत.
खेरीज आज नक्कीच काहीतरी बिनसलेलं असणार, नाहीतर मॉनिटरच्या हाती सत्ता सोपवून स्वत: डोक टेबलावर ठेवून शांत पडून रहायला जोशी बाई म्हणजे काय, शिंदे बाई होत्या का ? (शिंदे बाई सुद्धा काही दिवसांपूर्वी अश्याच म्हणत्या तर, आमचा मॉनिटर भागवत "बाई मी दाबू का तुमचे डोके" असे म्हणाला होता बाईंना ईतका क्यूट वाटला होता तो तेव्हा की, मध्ये एका लग्नात भेटल्या होत्या बाई तर त्या प्रसंगाची आठवण काढत होत्या! पण आज भागवतही गप्प होता, असल्या आगाऊपणाबद्दल जोशीबाई आत्ता काय रीएक्ट करतील नेम नव्हता)
पण सगळा वर्ग म्हणजे काही भागवत इतका शहाणा नव्ह्ता, त्यात बाई टेबलावर डोके ठेवून पडल्यात तर "अबक्या डरना"
बोलणा-यांच्या लिस्ट मध्ये हळुहळु नावं लिहिली जात होती, आणि आत्ता काय नावं लिहिलेच आहे तर अजून बोला, गलका आणिक वाढत होता, एक दोनदा बाईंनी "गपा रे" "येऊ का तिकडे" वगैरे बोलून झालेले. "सगळा वर्गमार खाईल ऑं ?" या धमकीवर जरा शांतता पसरली पण, आज पोरं मूड मध्ये होती, बाई उठल्या,
"हात पुढे कर.., हात पुढे करून उभे रहा रे सगळे..."
" बाई मी तर मॉनिटरे ..."
"तुला पहिला .. मग.. कित्ती वेळा सांगायचे"
सप्पाक ....
भागवत मेजर लाल झाला होता,
कुल्या, रावत्या अस्से एक एक वीर पडत होते... वेताने सेना कापत बाई निघाल्या होत्या, नी अचानक,
"हाआआत पुढ्ढे ......." खिशात लपवलेला एक हात बाईंनी खेचून मारासाठी तयार केला, अन.
"अहो बाई त्याला नका मारू . बाई ..तो.." कुठुनसे वाक्य आले..
सप्पाक ...
"मुका आहे तो ...." वाक्य पूर्ण...
कॊणी मारताना अडवले म्हणून जोशी बाईंनी जास्त जोरात मारले ..कोण जाणे..सगळा राग जणु एका वारात एकवटला होता,
...
हात तसाच आऊट्स्ट्रेटच्ड, चेह-यावर ..सगळ्या जगाविषयीचा अविश्वास, जखमेतून रक्त वहावे तसे डोळ्यातले पाणी आता गालावरूनही घरंगळलेले...
आणि बाईही स्टन्ड..
वेत तसाच बाजूला ठेवून .. मग...बाईंनी तो हात हातात घेतला, चोळुन, "अरे तू..रे मग..पण" असलं काही म्हणाल्या असाव्यात,
जोशी बाई बाहेर गेल्या...
सगळे तसेच उभे, बाजुच्याने समजून मग याला पाणी दिले, खाली बसवले, रोज नेहमी लावलेले पण आज काकोणास ठाऊक, खिशात ठेवलेले, ऐकायचे मशीन मग याने कानांवर चढवले.
परीक्षेला त्याला समजावून सांगायला स्पेशल टिचर येत, परीक्षेच्या ज्या काही तोंडी सुचना, किंवा प्रश्नापत्रिकेताल्या चुका मग त्या त्याला समजावून सांगत, बरेचसे लिप रीडिंगने आणि बाकी बरेचसे मशीनमधून ऐकून, समजून. तोही शहाण्यासारखा मग .. आपला लिहित जाई, परिक्षा संपताना मग त्या बाई आणि एकदा येत, शहाणं हसून मग तो बाईंना "ठिकाय, अच्छा !" ची खुण करी. बाकी ईतकीच ओळख, आणि एक मित्र होता त्याचा, तो आणि हा मग सगळ्या जगाला विसरून बोलत खाणाखूणांत, मधल्या सुट्टीत, बस स्टॉप वर ...
आठवतेका ? रविवारी दुपारी विशेष बातम्या लागत, त्यात मग ती खिडकीतली बाई बातम्या वाचे आणि एक बाईत्या खूणांमध्ये ट्रन्स्लेट करी एक्झाक्टली तसे याचे बाईंशी किंवा दोस्तांशी संवाद चालत.
दहा एक मिनिटांनी बाई आल्या, बेक्कार रडुन आल्या असणार, येऊन याला गालाला हात लावत सॉरी म्हणाल्या, कुठली तगमग, चिडचिड.. कोणावर निघाली होती, याने बाकाखाली पडलेली छडी बाईंना परत दिली, वर नेहमीचंशहाणं हसू. अगदीच कसनुसं, शरणागत हसून, आतामात्र बाई स्वत: सगळ्यांसमोर मुसमुसायला लागल्या, "शांत बसा रे पाचच मिनिटे आहेत, भागवत, अटेंडन्स टिचर्स रूम मधे आणुन दे" छडी, पर्स घेऊन बाई डोळे पूसत वर्गाबाहेर पडल्या.
आता, आम्हाला मार खाण्याची सवय असली तरी, आणि त्यावेळच्या शाळांत मारणे हे कितीही नॉर्मल असले तरी, आणि -याचदा मार हा कितीही "वेल डिजर्वड" असला तरी, बाईंची तरी अशी कितीशी चूक म्हणावी, प्लस, त्या गिल्टचे ओझे जोशीबाईंना बराच काळ पुरलेच की,
आता हा निवाडा करावा लागतोय याचा ट्रिगर म्हणजे मासूम मधले हे गाणे,
दो नैना, और, एक कहानी
यात राहूल (जुगल हंसराज) आहे तो म्हणजे नसरूद्दीन शाहचा लग्नाआधीचा मुलगा, शबाना नसीरच्या संसारात याचं आगमन होतं, आणि मग, शबानाला आपण आवडावं यासाठी याचा आटापिटा अक्षरश: पिळवटून टाकतो, आपल्याच मुलांच्या वयाच्या या आगंतुकाला वगळुन फक्त आपल्या मुलांसाठी शबाना हे अंगाईगीत गातीये, राहूलसाठीच्या आपल्या सॉफ्ट कॉर्नरचे हे गाणे म्हणजे कडेलोट आहे
मग?
आपल्या मुलांना बापाकडुन मिळना-या प्रेमात भागीदार म्हणून आलेल्या राहूलला शबाना अशी वागवतेय, मग ती चुकतीये का? नसीरला बरचसं माफ करून मुलांसाठी तिनेही बरचसं पचवलंय ना!
कि राहूल ? ह्हे .. तो कसा चुकतोय, कि नसीर .. नाहिच ...
कसं करायचं Move on ? ऑं ? कसं..

थोडीसी है जानी थोडी है नयी ..
जहा रुके आंसू वही पूरी होगयी...
है तो नयी, फिरभी है पुरानी,
थोडासा बादल, थोडासा पाणी ..
दो नैना, और, एक कहानी...

खरंय
, त्याचे आंसू हि थांबलेच, जोशी बाईही नंतर दिवसभरात सावरल्याच की, मासूमही, ends on a good note,
जहा रुके आंसू वही पूरी होगयी...
गुलजार... काय बाबा तू.. लिहून जातोस ... तोडलंस लेका ...
-निखिल.